राज्यात चार महिन्यांत २० वाघांचा मृत्यू   

चंद्रपूर : मागील चार महिन्यांत देशात ६२ वाघांचा मृत्यू झाला असून, त्यामधील २० वाघ हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून, हे चित्र चिंताजनक आहे. १७ वाघांच्या मृत्यूने मध्य प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
महाराष्ट्रात पट्टेदार वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाघांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. देशात २०२२ या वर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार देशात ३ हजार १६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. तर २०२२ मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या ४४४ वर पोहचली होती; पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र वाघांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. वाघांचे मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार तसेच नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत.
 
मागील पाच वर्षांतील मृत्यूत २०२० मध्ये १०६ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये १२७, २०२२ मध्ये १२१, २०२३ मध्ये १७८ आणि २०२४ या वर्षी १२४ वाघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील ५ वर्षात देशभरात तब्बल १०० हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागातून पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
 

Related Articles